पिंपरी, दि. 9 : भाजपच्या दोन्ही आमदारांमधील टोकाच्या वादाचे दर्शन बुधवारी स्थायी समिती सभेत झाले. वाकडच्या रस्ते विकासाच्या मुद्दयावरुन चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी आयुक्त आणि नगरसचिवांना अरेरावी करत राडा केला. सुरक्षारक्षकांशी खेचाखेची करत माईकची तोडफोड केली.कागदपत्रे भिरकावित काचेचे ग्लास फोडले. यातच सभापतींनी एका सभेचे कामकाज पुर्ण करत तीन सभांचे कामकाज एका आठवड्यापर्यंत पुढे ढकलले. तासभर हा गोंधळ सुरु होता.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली आहे. आचारसंहितेमुळे गेले आठ आठवडे स्थायी समितीचे कामकाज बाधित झाल्यामुळे आजच्या सभेत चार विषयपत्रिकेवरील दोनशेहून अधिक प्रस्ताव निर्णयासाठी प्रतिक्षेत होते. कामकाजाला सुरुवात होताच जगताप समर्थक नगरसेवक शशिकांत कदम यांनी वाकड रस्तेविकासाच्या मुद्दयाला हात घातला. आयुक्तांनी रस्ते विकासाबाबात राज्य सरकारकडे सकारात्मक भूमिका का मांडली? सत्ताधारी भाजपच्या ठरावाला महत्त्व नाही का? आम्ही मुर्ख आहोत काय? याचा खुलासा करावा अशी मागणी कदम यांनी केली. त्यावर पुढील आठवड्यात खुलासा करतो, असे उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. सभापती संतोष लोंढे यांनी त्यास मान्यता दिली. आयुक्त-सभापतींच्या या उत्तरामुळे जगताप समर्थक चिडून उठले.
शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिजीत बारणे, झामाबाई बारणे आणि आरती चोंधे या सहा नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा कामकाज तहकूब करा, आग्रह जोरजोरात केला. तर, शहर विकासाचे असंख्य प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करु अशी भूमिका सभापती लोंढे यांनी घेतली. त्यातच महेश लांडगे समर्थक सुवर्णा बुर्डे यांनीही सभापतींची बाजू उचलून धरत सभा कामकाज चालू ठेवा. ज्यांना जायचे असेल त्यांनी बाहेर जावे अशी शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. आम्हाला सभेतून बाहेर काढता का, असा कांगावा करत सहा नगरसेवकांनी आदळआपट सुरु केली.
सभापती पक्षाविरोधी भूमिका घेत असून त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना नगरसेवकांची साथ आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला. तसेच, आयुक्त - नगरसचिवांना अरेरावी करत त्यांच्